-गणेश सुळ
केडगाव : विधानसभेच्या निवडणुकीमुळे यावर्षी दीड महिना उशीरा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये महायुतीची जास्त आमदार निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना उसाला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप पहिला हप्ता जाहीर न केल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दौंड तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. यापैकी तीन कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे.
गाळप सुरू झालेल्या कोणत्याही कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊस दराची प्रतीक्षा आहे. कारखानदारांनी उसाला प्रतिटन 3700 रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात दौंड शुगर.प्रा . लि आलेगाव ता.दौंड तसेच, एम .आर .एन.भीमा शुगर अँड पावर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पाटस व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पाटेठाण असे तीन कारखाने सुरू आहेत व अनुराज शुगर लि.यवत कारखाना बंद आहे. या कारखान्यांची ऊस गाळप चालू होऊन साधारण 25 दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. जयवंत शुगर ने पहिली उचल 3275 रुपये जाहीर केल्याने दौंड तालुक्यातील कारखान्यांनी देखील त्याप्रमाणात ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
मात्र, कारखानदारांकडून दर जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून ऊस दर जाहीर करण्याची मागणी होत आहे. साखर कारखान्यांनी दर अद्याप जाहीर केला नसल्यामुळे गुऱ्हाळ चालकांनी 2700 ते 2800 रुपये प्रतिटन दर केला आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दौंड तालुक्यातील आमदार राहूल कुल यांनी विधान सभेच्या निवडणुकीत नुकतीच हॅट्रिक मारली असल्याने व मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्याचीही चांगली जवळीक असल्याने दौंड तालुक्यातील सर्व कारखाने चांगला दर देतील, यासाठी आमदार प्रयत्न करतील अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. यामुळे दौंड तालुक्यातील कोणता कारखाना किती दर देणार आहे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील बाकी साखर कारखान्यांच्या बाजारभावाचा सारांश घेऊन त्यानुसार भीमा पाटस कडूनदेखील चांगला बाजार भाव दिला जाईल. मागील वर्षी देखील इतर कारखान्याच्या बाजारभावाप्रमाणे आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव दिला आहे.
-विकास शेलार – संचालक, भीमा सहकारी साखर कारखाना लि. पाटस