पिंपरी-चिंचवड : सांगवी येथे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. सात किलो गांजा, १७५ ग्रॅम चरस, १२ एलएसडी डॉट पेपर आणि इतर साहित्य असा एकूण २० लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
सांगवी स्मशानभूमीजवळ रविवारी (१७ मार्च) पावणे बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय २६), अनिकेत अनिल गोडांबे (वय २५), रोहन उत्तम कांबळे (वय २१), रुपेश गौतम जाधव (वय २१), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (वय २४, सर्व रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष, मयूर प्रवीण बाराथे (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी स्मशानभूमीजवळ काहीजण गांजा घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने तत्काळ कारवाई केली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ७ किलो २०० ग्रॅम गांजा, ४ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे १७५ ग्रॅम चरस, एक लाख ८० हजार रुपये किमतीचे १२ एलएसडी डॉट पेपर, ६ मोबाईल फोन, एक कार, ३ दुचाकी असा एकूण २० लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणातील मयूर बाराथे हा आरोपी पळून गेला आहे. अटक केलेल्या आरोपींना विशाल कदम याने गांजा आणून दिला होता. तर चरस हे त्यांनी मध्यप्रदेश येथून सेनानी नावाच्या व्यक्तीकडून आणले होते. एलएसडी पेपर हा अमली पदार्थ बाणेर येथे राहणाऱ्या हर्ष याच्याकडून आणल्याचे तपासात समोर आले आहे.