पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ३७ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केल्याची घटना घडली आहे. कोंढवा, विश्रांतवाडी आणि वानवडी परिसरात पोलिसांनी कारवाई करुन कोकेन, मेफेड्रॉन आणि गांजा जप्त करण्यात आला.
उंड्री मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक परदेशी नागरिक कोकेन विक्रीसाठी आल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचून हसेनी मुवीनी मीचाँग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० लाख ४० हजार रुपये किंमतीचे १५२ ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या दुसऱ्या कारवाईत किसन किसन नंदकिशोर लधार (वय ३४, रा. न्यु दर्शन कॉलनी, कलवड वस्ती, लोहगांव, मूळ रा. बिकानेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४ लाख ५० हजारांचे २२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. लधार हा धानोरीमधील माधवनगर रोड येथील अगत्य हॉटेलसमोर आला असून तो एमडीची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन तत्काळ पोलिसांनी कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी दोन ठिकाणी छापे टाकून ३५ लाख १६ हजार ९२१ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली होती.
देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन २३ जानेवारीला टाकलेल्या छाप्यानुसार २३ लाख ६८ हजार ५८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. १२५, देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात ११ लाख ४८ हजार ३४१ रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.