आळंदी, (पुणे) : पुण्यातील आळंदीत आणखी एका वीस ते पंचवीस वर्षीय महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. २९) सकाळी आठच्या सुमारास घडली. दरम्यान संबंधित महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महिला पोलीसाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवोक पुलावरून नदीपात्रात उडी मारली. दरम्यान, आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नवीन पुलाच्या खालच्या बाजूला तसेच अन्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव तसेच आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा तपास आळंदी पोलीस करत आहे.
इंद्रायणी नदीत उडी घेत महिला पोलिसाची आत्महत्या
इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून एका पोलीस महिलेने नदीत उडी मारली होती. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली होती. अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. दरम्यान, नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली आहे.