पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दुसरी नोटीस सोमवारी पाठविली आहे. प्रचार खर्चाचा ताळेबंद उमेदवारांच्या खर्च तपासणीच्या दुसऱ्या तपासणीत जुळत नसल्याने मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर यांच्यासह आणखी दोन अपक्ष उमेदवारांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी केलेल्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी सोमवारी झाली. आघाडीचे धंगेकर यांनी पहिल्या टप्प्यात २७ लाख ५९ हजार ६७७ रुपयाचा खर्च सादर केला. त्यामध्ये ९ लाख ५ हजार १८ रुपयांची तफावत आली होती.
महायुतीचे मोहोळ यांनी ३३ लाख १३ हजार ४०२ रुपयांचा खर्च सादर केला होता, त्यामध्ये २७ लाख २४ हजार २३२ रुपयांची तफावत आढळून आली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ यांना पहिली नोटीस पाठविण्यात आली होती. या दोन्ही उमेदवारांना ६ मेपर्यंत तफावत काढण्यात आलेल्या खर्चाचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचार खर्च तपासणीत रवींद्र धंगेकर यांचा आतापर्यंत ३८ लाख ८९ हजार ३९२ रुपये प्रचार खर्च झाला आहे. मात्र, धंगेकर यांच्या प्रचार खर्चात ११ लाख ६७ हजार ७०९ रुपयांच्या खर्चाची तफावत आढळून आली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा आतापर्यंत ४९ लाख ३४ हजार ५८ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यांच्या खर्चात ३६ लाख २७ हजार ५८४ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांना हिशेब सादर करा, अशी दुसरी नोटीस पाठविली आहे.