राहुलकुमार अवचट
यवत : अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना यवत येथील तृतीयपंथी समाजाच्या वतीने हा सोहळा अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कासुर्डी येथील दीपगृह सोसायटी वसतीगृहात तृतीयपंथी दीपा गुरु रंजिता नायक व सहकाऱ्यांनी भेट देऊन मुलांना शिधा वाटप केले. दीपगृह सोसायटी संस्था पुणे शहर व ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक व समाज विकासाचे उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे दीपा नायक यांनी सांगितले. आजचा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, वसतीगृहात देखील हा उत्सव साजरा व्हावा, या भावनेने याठिकाणी नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५० किलो साखर, १० किलो मुगडाळ व ९० किलो तांदूळ असा कोरडा शिधा यांसह मोतीचूर लाडूचे मुलांना वाटप करण्यात आले.
या वेळी बोलताना वसतीगृहाचे अधिक्षक राजेश निंबाळकर म्हणाले की, दीपगृह सोसायटी पुणे, कासुर्डी व चौफुला-सुपा रोड शैक्षणिक संस्थेच्या संचालिका आश्लेषा ओनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, संस्थेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या निराधार, अनाथ मुलांचा समावेश आहे. त्यांचे संगोपन, पालन-पोषण केले जाते. ही संस्था गेली २२ वर्षांपासून कासुर्डी येथे कार्यरत असून, वसतीगृहात एकूण ४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या वेळी दीपा गुरु रंजीता नायक, गौरी गुरु दीपा, राधा गुरु गौरी, अर्चना गुरु राधा, रंजना गुरु राधा यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचाही सन्मान केला. याप्रसंगी कासुर्डी गावचे पोलीस पाटील अश्विनी सोनवणे, अनिल गायकवाड यांसह संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, श्री महालक्ष्मी मंदिर येथे दीपागुरू रंजिता नायक व सहकाऱ्यांनी प्रथम प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अयोध्यानगरीत होत असलेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त यवत बाजारपेठेत व गावातील घरोघरी जात प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी लाडू वाटत आनंद व्यक्त केला. प्रभू श्रीराम यांच्या आगमनामुळे येणाऱ्या काळात सकारात्मक गोष्टी घडतील, असे या वेळी नायक यांनी सांगितले.