लोणी काळभोर, : लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा हनुमान जयंतीला होणार असून, त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. सोमवारी सकाळी महामस्तकाभिषेक करून सायंकाळी घटस्थापना करण्यात आली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा शुक्र मंगळवारी (ता. २३) व बुधवारी (ता.२४) साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेनिमित्त गुढीपाडव्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही यात्रा म्हणजे अंबरनाथ (काळभैरवनाथ) व जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा असतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्याच्या मोठ्या घागरी लावलेली कावड गावातील गणपती मंदिरापासून अंबरनाथ मंदिरात नेली जाते. घटस्थापनेच्या पाचव्या दिवशी ही कावड लोणी काळभोर व म्हातोबा आळंदी गावाच्या शिवेवर सह्याद्रीच्या डोंगरात असलेल्या गवळेश्वर महादेव मंदिरात नेली जाते. तेथे छोटा धार्मिक कार्यक्रम केला जातो. नंतर अंबरनाथ मंदिरात साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो.
सोमवारी (ता.15) सकाळी महामस्तकाभिषेक करून सायंकाळी घटस्थापना करण्यात आली. घटाच्या पाचव्या माळेच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी घाणा भरणे म्हणजे हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. घटाच्या सातव्या माळेच्या दिवशी श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. हनुमान जयंतीला पहाटे चार वाजता श्रींच्या मूर्तीची महापुजा केली जाते. त्यानंतर गावातील भाविक देवाला नैवेद्य दाखवतात. त्याच दिवशी रात्री छबिना, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. पहाटे तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
दरम्यान, २४ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीचा विवाह सोहळा होणार आहे. दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा आखाडा होणार असून, २५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीच्या विवाहा निमित्त वरातीचा कार्यक्रम होणार आहे. ही प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आलेली असून, ग्रामस्थ आजही भक्तिभावाने या प्रथेचे पालन करतात.