लोणी काळभोर: साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती लोणी काळभोर (ता. हवेली) येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोणी काळभोर येथील लहुजी शक्ती सेनेने आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथील महात्मा फुले नगर परिसरात रविवार (ता.18) आणि सोमवार (ता.१९) असे दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोफत आरोग्य शिबीर, व्याख्याने, गाणी व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कळम-धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक चंदन कांबळे, लहुजी शक्ती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष दीपक लोखंडे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
रविवारी (ता.18) महापुरुषांच्या प्रतिमांचे सर्वात प्रथम पूजन करण्यात आले. त्यानंतर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्यावतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोणी काळभोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. दुपारच्या सत्रामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांची रथ यात्रेद्वारे भव्य मिरवणूक काढून जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. यावेळी पाथर्डी गावचे माजी सरपंच आश्रुबा राजाराम धेले, एस.पी. जे. प्रोसेसचे शरद सावंत, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप, लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष स्वप्निल शिंदे, उपाध्यक्ष उद्धव काळुंखे, दत्ता कवळे, निशांत कांबळे, विशाल सहाने, महेश कांबळे, श्रेयश ढेले, मंगेश कांबळे, ओमकार कांबळे, कैलास ढेले, कानिफनाथ जगदाळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१९) सकाळी दहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सदरातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. संघटनेचे संघटक राहुल अश्रुबा धेले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटक शंकर वाघमारे, उमेश मचाले, सहसचिव समाधान गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दुपार सत्रामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे व सर्व महापुरुषांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांच्या गीतांचा सदाबहार कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना विष्णूभाऊ कसबे म्हणाले की, लहुजी शक्ती सेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मातंग समाजाला विविध योजनांचा लाभ भेटला आहे. मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या वर्गीकरणातून आपली वेगळी भाकर मिळणं, हे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला विरोध करावा. तसेच मातंग समाजाने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत दिलेल्या निकालाचे स्वागत करून जल्लोष साजरा करावा, असे आवाहन कसबे यांनी यावेळी केले.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, आकाश मात्रे, नितीन दोडके, अनिकेत हजारे, नितीन वायदंडे, लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय भालेराव, उद्योजक पृथ्वीराज पवार, सयाजी पवार, श्रीकांत शेलार, लक्ष्मण जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे शिवाजीराव अडसूळ, भैरवनाथ जाधव, प्रीतम गालफाडे, महेश चांदणे, महेश साठे, सौदागर आलाट, शुभम मोरे, सुमित हजारे, अर्जुन थोरात, भाऊसाहेब उगले, प्रमोद अंकुश, बबन शिंदे, ऋषिकेश वैरागे, अजय मोरे यांचे बहुमुल्य योगदान मिळाले.