शिक्रापूर : नागपंचमी सण नुकताच साजरा झाला असून, गारुडी मुक्त नागपंचमी साजरी करण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केलेले असताना शिक्रापूरच्या आठवडे बाजारात नाग घेऊन फिरणाऱ्या गारुडी दाम्पत्याकडील नाग जप्त करून योग्य उपचार करत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील आठवडे बाजारात एक गारुडी दाम्पत्य नाग घेऊन फिरत असल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर शिक्रापूर समस्या उपाय ग्रुपचे गणेश सासवडे यांसह आदींच्या उपस्थितीत सदर नाग जप्त केला, दरम्यान नागाचे तोंड चिटकवल्याचे दिसून आले. सर्पमित्रांनी याबाबतची माहिती शिरुर वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे व नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना देत नागाचे तोंड मुक्त करुन नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे.