पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणेकर सोडाच पण पुण्यातील पोलीस तरी सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर गाडी अडवल्याचा राग आल्यानं नोकरी कशी करतोस, तेच बघतोच, असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
अशातच आता वाहतूक नियमभंग करुन वेडीवाकडी गाडी चालविल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला अडविले. त्यामुळे दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या दुचाकीस्वाराला अटक केली आहे.
आशीष रामचंद्र चव्हाण (वय-३७, रा. चंद्राई हाईटस, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक सदाशिव भोईर यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज बायपास चौकात शुक्रवारी (दि. १६) सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलीस शिपाई दीपक भोईर हे कात्रज बायपास चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी आशीष चव्हाण हा दुचाकी जोराने व वेडीवाकडी चालवत वाहतूक नियमभंग करुन आल्याने भोईर यांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे लायसन मागितले. तेव्हा त्याने अरेरावी व उद्धट वर्तन करत फिर्यादी यांना हाताने
जबर मारहाण केली.
फिर्यादी यांच्या डाव्या गुडघ्यावर आणि कंबरेवर जोरजोराने लाथा मारुन फिर्यादीचे डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत केली. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांचा शासकीय गणवेशाचा खिसा फाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन भोईर याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.