पुणे : मुलगी आजारी आहे, त्यामुळे घरासमोर फटाके फोडू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने सात जणांनी मिळून फिर्यादींना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना नुकतीच वाकड येथे उघडकीस आली. याप्रकरणी चार महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा प्रकार रविवारी (ता. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास रामनगर, रहाटणी येथे घडला. अक्षय राजकुमार मोहने (वय २५), व्यंकटेश राजकुमार मोहने (वय २१), नयन बंडू भंगारे (वय १९) यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विनोद जागेश्वर महेश्वरी (वय ३५, रा. रामनगर, रहाटणी, पुणे) यांनी सोमवारी (ता. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या समोर रहातात. रविवारी आरोपी अक्षय, व्यंकटेश व नयन हे फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर फटाके फोडत होते. फिर्यादी यांची मुलगी आजारी असल्याने त्यांनी आरोपींना येथे फटाके फोडू नका, मुलगी आजारी आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने सात जणांनी मिळून फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.
या घटनेत फिर्यादी यांच्या कपाळावर दुखापत करुन त्यांच्या पाठीचा चावा घेऊन जखमी केले. तर फिर्यादी यांच्या पत्नीच्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन व मुलगा वैभव याला हॉकीस्टीक फेकून मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.