पुणे : एजन्सीच्या वसुली अधिकाऱ्यांसोबत वाद सुरु असताना त्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून एकाला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार मार्केटयार्ड परिसरात घडला आहे. याबाबत मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार वखार महामंडळाच्या जवळी पी.एम.टी. बसस्टॉप समोर शनिवारी (ता. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत सागर किशोर तुपसुंदर (वय ३८, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनोद चव्हाण (वय-२३, रा. म्हसोबा चौक, टिळेकर नगर, कोंढवा) व शुभम देविदास पवार (वय-१९, रा. टिळेकर नगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे माही एजन्सी कंपनीत वसुलीचे काम करतात. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पी.एम.टी. बस स्टॉपसमोर आरोपींचे एक महिला व पुरुषासोबत वाद सुरु होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग करत होते. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या तोंडावर, नाकावर व पाठीवर हाताने व पायाने मारहाण केली. तसेच खाली पाडून लाकडी बांबूने मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी यांच्या दाताला गंभीर दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शिवागाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.