पुणे : भाचीविषयी अपशब्द वापरुन तिची बदनामी करीत असल्याचा संशय आल्याच्या कारणाने चिडलेल्या मामाने तरुणाचा लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून निघृण खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ऐन धुलवडीच्या दिवशी सोमवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील अप्पर डेपोजवळील ओसवाल मार्केट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. बसवराज गजेंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आतिश गुलाब शिरसाट (वय २५, रा. डॉ. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सागर मधुकर पासलकर (वय ३८, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. शिरसाट आणि पासलकर हे मित्र आहेत. बसवराज गजेंत्रे हा मार्केट यार्ड येथे कचरा गाडीवर काम करीत होता. तो शिरसाटच्या भाचीविषयी अपशब्द वापरुन तिची बदनामी करीत असल्याचा संशय शिरसाटला आला होता. याच कारणावरून तो संतप्त झाला होता. रागाच्या भरात त्याने गजेंत्रे याला सोबत घेऊन अप्पर इंदिरानगर परिसरातील पीएमपी बस डेपोजवळच बांधकाम सुरू असलेल्या व्यापारी संकुलात गेला. त्यानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन त्याच्यावर हल्ला करून खून केला. त्यानंतर, त्याने पासलकरकडे जाऊन आपल्याकडून खून झाल्याची माहिती दिली.
पासलकर यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्याच दरम्यान, पोलिसांना स्थानिक कामगार आणि नागरिकांकडून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक (गुन्हे) लोंढे यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.