पुणे : टिळक रस्ता परिसरात खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याच्या रागाने एका सराइत गुंडाने एका तरुणावर कोयत्याने वार केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडेलिंगसाठी नेले होते. त्यामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता.
मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पलायन केलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे अधिक तपास करत आहेत.