पुणे : किरकोळ कारणावरून गंभीर मारहाणीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन जखमी केले. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या डोक्यात विटेने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शाहिद याकुब शेख (वय-१९, रा. शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उमर (वय-१९) व इम्रान (वय-२३ पूर्ण नाव माहित नाही
दोघे रा.कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्य़ादी शाहिद व त्याचे मित्र आमन व शाहनवाज मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी आरोपींनी शाहिद याला बोलावून ‘तू मला भगवा चौकातून सिगारेट आणून दे’ असे सांगितले. शाहिद याने सिगारेट आणून देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन जवळ पडलेल्या लाकडी बांबूने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी शाहिद याचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला. आरोपींनी त्यालाही विटाने हातावर व डोक्यावर मारुन जखमी केले.