संदीप टूले
केडगाव : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा परिणाम चिमुकल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आहे. बेमुदत संपामुळे मुलांना शाळेविषयी वाटणारी गोडी कमी होण्याची भिती पालकांनी व्यक्त केली. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी पालकांसह नागरिकांची मागणी आहे.
या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या…
कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत. परंतु, दोन वर्षे उलटून गेली तरी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिना अर्ध्या मानधनाएवढी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. मात्र, अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पूरक पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करावी तसेच कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ४ महिन्यांपूर्वी दिला आहे. परंतु, राज्य सरकारमार्फत अंगणवाडी सेविकांना अद्याप मोबाईल दिलेले नाही. या मागण्यांसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ७ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.
तुटपुंज्या मानधनात घरखर्च भागत नाही!
आम्हाला पुरेसे मानधन मिळत नाही. तुटपुंज्या मानधनात घरखर्च भागत नाही. शासनाने आम्हाला मोबाईल देऊन ५ वर्षे झाली. आता ते पूर्णपणे बंद पडले आहेत, तर काहींचे मोबाईल केवळ नावालाच सुरू आहेत. मोबाईलमध्ये डाटा व्यवस्थित भरला जात नाही. त्यामुळे या कामासाठी आम्हाला स्वतःचे मोबाईल वापरावे लागत आहेत. अशा प्राथमिक गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
– रुपाली अडागळे, अंगणवाडी कर्मचारी