वार्ताहर- संतोष पवार
पळसदेव (ता.इंदापूर) : ऐतिहासिक परंपरा लाभलेले आणि प्राचीन हेमाडपंथीकालीन असणारे पळसदेव (ता.इंदापूर) येथील पळसनाथाचे मंदिर तब्बल 46 वर्ष उजनी धरणाच्या पाण्यात राहुनही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे.
उजनी धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने प्राचीन पळसनाथ मंदिर पाहण्याची नामी संधी आता पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. मजबुत बांधकाम आणि विविध कलाकुसर असणाऱ्या या मंदिराच्या स्मृती म्हणजे ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचा उत्तम नमुना असल्याचे आढळून येते. मंदिराच्या गाभाऱ्यातील असणारी कोरीव शिल्पकला, सुबद्ध मांडणी असणारा सभामंडप, दगडी खांब आदि तत्कालीन बांधकाम शैलीची साक्ष देणारा आहे.
ग्रामदैवत असलेले प्राचीन पळसनाथ मंदिर पाहण्यासाठी पळसदेव पंचक्रोशीतीलच नव्हे तर राज्यासह अनेक भागातील हजारो पर्यटक आणि भाविकांना मंदिराला भेट देण्याचे भाग्य आता लाभले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक इतिहासकालीन वास्तू आणि मंदिरे आता दिसु लागली आहेत . त्यापैकीच असणारे पळसनाथाचे मंदिर 46 वर्षात पाचव्यांदा पूर्णपणे पाण्याबाहेर असल्याचे दिसून येते.
प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येथे येत आहेत . ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेल्या प्राचीन पळसनाथ मंदिराचे जतन करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे ..