भोर, (पुणे) : शरद पवार यांच्यामुळे माझं मुख्यमंत्रिपद हुकलं, असं आवर्जून सांगत यंदा बारामती लोकसभेला प्रचार कुणाचा करायचा हे अद्याप ठरवले नसल्याचे अनंतराव थोपटे म्हणाले आहेत. आज शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी भोर येथे अनंतराव थोपटे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी थोपटे यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. यावेळी थोपटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पुढे बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले, त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती. मात्र एकटे शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यामुळे तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांना माहित आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. शरद पवार मला काही दिवसांपूर्वीच भेटून गेले आहेत.
शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे इच्छुक आहेत. त्यामुळे मी कुणाचा प्रचार करणार हे मी कुणालाही सांगितलेले नाही किंवा त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही विचार करून याबद्दल निर्णय घेणार, असे विधान थोपटे यांनी केलं आहे.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच भोर मध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. तब्बल 25 वर्षानंतर पवारांनी थोपटे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, अनंतराव थोपटे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना शरद पवारांनी त्यांचा पराभव केला असं बोललं जात आहे. त्यावेळी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून अनंतराव थोपटे यांच्या विरोधात काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी काशिनाथ खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता.