राजेंद्रकुमार शेळके
पुणे – मराठी भाषा सन्मानार्थ मराठी स्वाक्षरी मोहीम घेवून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
२७ फेब्रुवारी हा ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस. मराठी भाषेचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, प्रचार-प्रसार व्हावा या विविध उद्देशाने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. वैभवी काळे, प्रा. शहाजी शिंदे, डॉ. रेखा जोशी, डॉ. नागेश भंडारी, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. दत्तात्रय फटांगडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लेखन केलेल्या ‘सृजन’ भित्तीपत्रकाचे मान्यवरांचे शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी या सर्वांनी मराठी स्वाक्षरी करून मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचा निश्चय केला.
दरम्यान, ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, संदर्भ ग्रंथ, विज्ञान साहित्य व मासिके आदी साहित्यसंपदेची मांडणी करण्यात आली होती.
यावरून बोलताना प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या की, भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्व ज्ञानशाखांनी आपले साहित्य मराठीमध्ये आणले पाहिजे. ‘भाषेशिवाय व्यवहार झाला असता पण भावना व्यक्त होऊ शकल्या नसत्या. प्रत्येक राज्य भाषेसाठी करीत असलेले प्रयत्न आणि प्रदेशानुसार बदलत जाणारी बोलीभाषा यावर आपले मत प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामकाजातील मराठी, व्यवसायनिहाय होत जाणारा मराठीचा वापर आदींची उदाहरणे देताना भाषा कौशल्याचे महत्त्व पटवून दिले.
पुढे बोलताना चौधरी म्हणाल्या की, वयोमानानुसार आपले वाचन विषय बदलत जातात. लहान मुलांना मराठी लेखन अवघड वाटते. असे घडू नये म्हणून प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
यावेळी प्रा. शहाजी शिंदे, प्रा. वैभवी काळे, प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांच्याबरोबरीने प्रियांका मारणे, अंजली तिवारी, मुक्ता काकडे, अनुजा टेकाळे, ऐश्वर्या जोगी, निलेश अहिरे, वृषाली मारणे, प्रीतमकुमार इंगळे, आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्रा. अश्विनी जाधव, विद्यार्थी अनुजा रानवडे, प्रतीक्षा सोनार, अनुजा टेकाळे, वृषाली मारणे, मुक्ता काकडे आदींनी सुबक अशी रांगोळी काढली तर ग्रंथालय विभागातील प्रा. अविनाश हुंबरे, अरुणा पोटे, दीपक गालफाडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले. तर प्रा. अविनाश हुंबरे यांनी आभार मानले.