Anandacha Shidha | पुणे : गुडीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार “आनंदाचा शिधा” अद्याप ही नारिकांना मिळाला नसल्याचे समोर आले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे “आनंदाचा शिधा” (Anandacha Shidha) ला संपाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पाडवा गोड होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण…राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर
राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’वाटण्याचा निर्णय घेतला. याचा केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना लाभ होणार आहे. दौंड तालुक्यातील 52 हजार 524 जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु, जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
केडगाव पुरवठा विभागात रवा, चणाडाळ, साखर, पामतेल आलेले नाही. दौंडच्या पुरवठा विभागात काही ठरावीकच वस्तू आल्या आहेत. महसूल विभागाचा सर्व कर्मचारी वर्ग संपावर गेला आहे. मात्र, गावपातळीवर कोतवाल यांना पुरवठा विभागाकडून आलेल्या गाड्या खाली करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती नायब तहसलीदार स्वाती नरुटे यांनी माध्यमांना दिली.
संपामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा ठप्प झाल्याने आनंदाचा शिधा गाड्यांमध्ये कधी भरला जाणार, तो गावपातळीवर केव्हा पोहचणार आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या हातात कधी पडणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शासनाने योजना जाहीर केल्यापासून जो-तो लाभार्थी रेशनिंग दुकानात गेल्यावर आनंदाचा शिधा असलेला रवा, चणाडाळ, साखर, पामतेल आले आहे का? असे विचारत आहे. मात्र, त्याला मोकळ्या हाताने परतावे लागत आहे. संपामुळे गुढीपाडव्याला शिधा मिळणे कठीण झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Old Pension Scheme : संप काळात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याच्या आरोग्य आयुक्तांच्या सूचना