पुणे : रस्त्याने जाताना ओळख दाखवली, मात्र ‘भाई’ म्हटलं नाही म्हणून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात रॉड घातल्याचा धक्कादायक प्रकार खडकीतील शिवाजी पुतळा चौक येथे बुधवारी (दि. ४) सायं साडे आठच्या सुमारास घडला.
प्रफुल्ल ऊर्फ कान्या सोनवणे (वय ३०, रा. नवी खडकी), संकेत मारे ऊर्फ मेड्या (रा. यशवंतनगर, येरवडा) आणि सोनु मारे अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. तर संतोष साळवे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष साळवे (वय ३६, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे हे जिममध्ये व्यायाम करुन दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी चौकात त्यांच्या ओळखीचे काही जण थांबले होते. तेव्हा संतोष याने प्रफुल्ल सोनवणे याला काय पप्या काय चालले आहे? असे विचारले. तेव्हा जवळच उभा असलेल्या संकेत मोरे याने फिर्यादी याला थांबवून ‘काय तुला लय मस्ती आली आहे का? तुला भाई बोलता येत नाही का? तू लय मोठा भाई झाला का?’ असे बोलून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
दरम्यान, संकेत मोरे याने संतोषच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि त्याचा मोबाईल फोडला. इतर लोक भांडणे सोडवण्यासाठी येत असताना त्यांनी हवेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना ‘तुम्ही इथे थांबू नका, याला आम्ही जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करत आहेत.