पुणे : घर विकायचे नाही, असे सांगितल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम फेज वन येथे घडला. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी आई आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भिमराव गजेंद्र पाडगळे (वय ५२, रा. गंगाधाम फेज-१, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन मुलगा प्रशांत पाडगळे (वय-२५), मालती पाडगळे (वय-४३) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हांडेवाडी येथे दोनमजली घर आहे. ते घर विकायचे असून, घर विकण्यासाठी लागणारी घराची कागदपत्रे येणार असल्याचे फिर्यादी यांच्या मुलाने सांगितले. यावरून फिर्यादी व मुलामध्ये कडाक्याचे वाद झाले. फिर्यादी यांनी मुलाला आपल्याला घर विकायचे नसल्याचे समजावून सांगितले. दरम्यान, दोघांमध्ये वाद सुरू असतानाच फिर्यादी यांची पत्नी आली. फिर्यादी व पत्नीमध्ये वाद सुरु असतानाच मुलाने घरातील लोखंडी पहार वडिलांच्या डोक्यात मारली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.