पुणे : ऑक्सव्हिसीझ ऑटोमेशन टेक्नॉलॉजीज या साॅफ्टवेअर कंपनीचे सीईओ सिद्धेश सुखदेव कंद यांनी आपल्या आईच्या सुवर्णमहोत्सवी जन्मदिनानिमित्त शिंगणवाडी (भंडारदरा) ता. अकोले, जि. अहमदनगर येथील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शनिवार (दि. २०) शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप केले.
यावेळी करुणा कंद यांनी किशोरवयातील आठवीच्या विद्यार्थ्यीनींना आहारविषयक, आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. आदित्य हिंदोळे, मोहन उघडे, अरुण गांगड, गौरी मधे, स्वाती पोकळे, विजय पोकळे, रोशनी पोकळे या मुलांनी विविध गुणदर्शन केले. लहान मुलेही गाणी गोष्टी आणि कृतीयुक्त खेळात सहभागी झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी “केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा” हे भक्तीगीत सूरेल आवाजात सादर केले. शिंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक कोकतरे मिलिंद, शिक्षक घुले संतोष, गांगड गोरख, गांगड लहू, निवृत्ती पोकळे, SMC अध्यक्ष काळू पोकळे, SMC सदस्य गोरख उघडे, भरत सोनवणे, योगेश सोनवणे हे ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी ऑक्सव्हिसीझ कंपनीच्या वतीने हजर असलेल्या सुखदेव भगवान कंद, विनायक गायकवाड, अनिकेत उंद्रे, सुदर्शन सुखदेव कंद यांचा सत्कार केला. विद्यालय आणि ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.