पुणे : सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे येथे रिअल इस्टेट एजंटने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव मयूर सुनील नरे (वय-31 रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिविनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप म्हणून मयूर नरे यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते बांधकाम प्रकल्पाची कामे आणि इस्टेट एजंट म्हणूनही काम करत होते.
मयूर नरे हे शनिवारी त्यांच्या व्यावसायिक कार्यालयामधून रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यादरम्यान त्यांच्या भावाने रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहिले असता मयूर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मयूर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल ही आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी मयूर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलीसांना मिळाली आहे. यामध्ये अनेकांचे देणे-घेणे त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.