पुणे : वीज देयक न भरल्याने, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणमधील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, एवढेच नव्हे तर त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद वकार अहमद मोहम्मद मुख्तार शेख (वय ३६, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अफजल बागवान (रा. गॅलेक्सी प्रीमियम सोसायटीसमोर, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान याने वीज देयक न भरल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शेख हे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कोंढवा येथील आरोपीच्या घरी गेले होते. वीज मीटरवर कारवाईसाठी शेख गॅलेक्सी सोसायटीच्या आवारात पोहोचले, त्यावेळी संतप्त झालेल्या शेख यांना बागवानने कानाखाली मारली. शेख यांच्यावर पाईप उगारला, मारहाण केली, तसेच शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.