भोर : भोर तालुक्यातील कापूरहोळ-भोर रस्त्यावर भरधाव डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, घटना घडल्यानंतर रस्त्याचे काम सुरू असलेल्या या ठिकाणावर काम करत असलेल्या सर्व कामगारांनी देखील घटनास्थळावरून पळ काढला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ-भोर रस्त्याचे काम गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, खडी देखील अस्ताव्यस्त पडली आहे. इंगवली गावाच्या हद्दीत हॉटेल जय मल्हारसमोर देखील अशीच स्थिती आहे. या रस्त्यावरून महिला व तिचा मुलगा महाड याठिकाणी निघाले असता, खडीवरून दुचाकी (एम.एच. १२ पी.यु. ३०९३) घसरली आणि दुचाकीवरील लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) या खाली पडल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपर (एम.एच.१३ डी.क्यू.००९२) लताबाई यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच वाहनचालकाने वाहन सोडून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
माणुसकी हरवली…
दरम्यान, भरधाव डंपरचे चाक डोक्यावरून गेल्यानंतर लताबाई येलमकर यांचा मृतदेह सुमारे एक तास घटनास्थळी आहे त्या स्थितीत पडला होता. मात्र, कोणीही मृतदेहाच्या जवळ जाण्यास धजावत नव्हते तर रस्त्यावरील वाहनधारक देखील तेथे थांबण्यास तयार नव्हते. समाजातील माणुसकी हरवल्याची भावना या अपघाताच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.