पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पोलिसांनी पकडले म्हणून एका मद्यपी वाहन चालकने महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलीस हवालदार समीर सावंत हे दोघे या घटनेत जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात घडला
याबाबत पोलीस हवालदार समीर सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संजय फकीरबा साळवे (वय-३२, रा. पिंपरी चिंचवड, मुळ जालना) याच्या विरूद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय साळवे हा मद्य प्राशन करून वाहन चालवत होता. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी साळवेला पकडले. पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत असताना पोलिसांच्या हातातील मशीन त्याने हिसकावली. हा प्रकार समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलेजा जानकर त्या ठिकाणी आल्या.
त्यावेळी काही समजण्याच्या आतच साळवे याने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकले. त्यानंतर त्याने लाईटर काढून दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर साळवे याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.