पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दवाखान्यात जायला पैसे नाहीत, अन् तुम्हाला दारु प्यायला पैसे आहेत, असे बोलल्यामुळे दारुड्या नवर्याने पत्नीचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी दत्तनगरमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी सायली मयुर कळंबेकर (वय-२८, रा. दत्तनगर, आंबेगाव) या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मयुर सुरेंद्र कळंबेकर (वय-३६, रा. दत्तनगर, आंबेगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला यांना तीन मुली आहेत. त्यांचा पती मयुर हा गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. तो नेहमी दारु पिऊन त्याच्या पत्नीला विनाकारण त्रास देत असतो. २३ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे मयुर दारु पिऊन रात्री साडेनऊ वाजता कामावरून घरी आला. त्यांची मुलगी गेल्या ८ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकल्यामुळे खूप आजारी आहे. मात्र, पैसे नसल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आले नाही.
दरम्यान, मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यास पैसे नाहीत, आणि तुम्हाला दारु प्यायला पैसे आहेत, अशी विचारणा सायली यांनी केली. त्यावर मयुर याने तिच्याशी भांडण केले. त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला विचारले कि, सिलेंडर कोणी दिला. त्यावर फिर्यादी यांनी गेली सहा दिवसांपासून घरातील सिलेंडर संपला आहे. तुम्ही आणला नाही. त्यामुळे माझ्या आईने सिलेंडर भरून दिला आहे, असे सांगितले असता त्याचाच राग आला आणि त्याने सायलीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
फिर्यादी यांचे डोके भिंतीवर दोन तीन वेळा आपटून गंभीर जखमी केले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतिला अटक केली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.