-बापू मुळीक
सासवड : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेला 118 वर्षाची शैक्षणिक परंपरा आहे. मागील काही दिवसापासून समाज माध्यमाद्वारे शाळेबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. 12 जुलै 2024 पासून शाळेतील एक खोली इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या कामासाठी दिलेली आहे. या वर्गखोलीत बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यात आलेल्या आहे. त्यांच्या सुरक्षितेसाठी 24 तास पोलीस सुरक्षा शासनाने दिलेली आहे. याचा वेगळा अर्थ लावून समाज माध्यमाद्वारे चुकीची माहिती पसरून विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून शाळेची प्रतिमा डागाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
या संदर्भात दि. 18 जुलै 2024 रोजी चुकीची बातमी दैनिक ‘क्रांती ज्वाला’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाची तपासणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत शाळेत प्रत्यक्ष भेट देण्यात आली. या प्रकरणाची शहानिशा केली असता, असा कुठलाही प्रकार शाळेत घडला नाही, अशी त्यांची खात्री झाली आहे. तरी याबाबत समस्त सासवडकर वासियांना या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे, की म.ए.सो वाघीरे विद्यालयात असा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
समाज माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये, अशी विनंती करण्यात येत आहे. सदर बातमी विषयी कोणतीही शहानिशा न करता शाळेची नाहक बदनामी करणारे वृत्त “क्रांती ज्वाला “या वृत्तपत्राने समाजात प्रसिद्ध केले आहे. शाळा प्रशासनाकडून” क्रांती ज्वाला “वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक रामदासी डी.आर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .