लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकाजवळ दोन दुचाकी व बसचा तिहेरी अपघात 10 जुनला झाला होता. या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी शामराव लाटे ही गंभीर जखमी झाली आहे. ज्ञानेश्वरीला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्ञानेश्वरीवर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्याचा सुमारे 28 लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांनी पुढे येऊन ज्ञानेश्वरीसाठी एक हात मदतीचा द्यावा. असे आवाहन तिचा मामा शिवराम कराड यांनी केले आहे.
शिवराम कराड व ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा-भाची आहे. ज्ञानेश्वरी ही वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती मामाकडे राहत होती. व दररोज मामा तिला कॉलेजला जाण्यासाठी दुचाकीवरून बस स्टॉपपर्यंत सोडवीत होते. दरम्यान, ज्ञानेश्वरीला शाळेत सोडविण्यासाठी जाताना 10 जुनला अपघात झाला. ज्ञानेश्वरी गाडीवरून उडून पीएमपीएल बसच्या चाकाच्या समोर पडली. व पीएमपीएल बसने ज्ञानेश्वरीला 10 ते 12 फुट फरपटत नेले होते.
या अपघातात ज्ञानेश्वरी लाटे गंभीर जखमी झाली होती. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये तिच्या दोन्ही खुब्यांना व मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. रुग्णालय प्रशासनाने सुमारे 28 लाख रुपयांचे बिल तिच्या नातेवाईकांच्या हातात दिले आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम उभी कशी करायची, हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न पडला आहे.
दरम्यान, याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वरीचा मामा शिवराम बन्सी कराड (वय-38, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपीएल चालक सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय-45 रा महारूद्रा वास्तु कवडीपाट टोलनाका ता. हवेली जि. पुणे) व दत्ताराम रमेश कांबळे (वय-34, गंगानगर फुरसुंगी हडपसर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न मिळाल्याने ज्ञानेश्वरीला रुग्णालयात खितपत पडण्याची वेळ आहे.
मदतीसाठी आवाहन
ज्ञानेश्वरीला उपचारासाठी सध्या 28 लाख रुपयांचा खर्च आला असून अजूनही तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या बिलाची एवढी रक्कम आम्ही भरू शकत नाही. त्यामुळे समाजातील दानशुरांनी पुढे येऊन ज्ञानेश्वरीला वाचविण्यासाठी मदत करावी. त्यासाठी शिवराम बन्सी कराड यांच्या फोन पे व गुगल पे 9420552441या क्रमांकावर पैसे पाठवावे. असे आवाहन शिवराम कराड यांनी केले आहे.