लोणी काळभोर : जीवनात अश्रूंसाठी दुःख लागते; दुःखासाठी वेदना लागतात; वेदनांसाठी लागते भावना; भावनांना असते संवेदना; संवेदनेला लागते जाणीव; अन् जाणीव व्यक्त करायला लागतात ते ‘शब्द’. कविता हा शब्दांचा खेळ आहे. मनातील व्यथा सांगणे हेही कवितेचे लक्षण आहे. कवितेत वास्तविकता, कल्पना, समाजभान इत्यादींचा अंतर्भाव असावा मात्र तिच्यात विकार नसावा. कारण, शब्दांत विकार आला की कविता मार खाते, असे मत ज्येष्ठ कवी तथा महाराष्ट्र साहित्य परिषदच्या चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे ‘अनंत …अंतर्नाद मनाचा’ या व्यंकटेश कल्याणकर संपादित व डॉ.राहुल ठाकरे सह संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील मत राजन लाखे यांनी मांडले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, ज्येष्ठ कवी आणि गझलकार म.भा.चव्हाण, प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.मुकेश शर्मा, डॉ. रजनिश कौर सचदेव-बेदी, डॉ.अतुल पाटील, डॉ.श्रीकांत गुंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काव्यसंग्रहाबद्दल बोलताना लाखे म्हणाले, विश्वात अनेक गोष्टी ‘अनंत’ आहेत. आपल्या विचाराला, ज्ञानाला अंत नाही. परंतु, आयुष्याला मात्र नक्कीच अंत आहे. मात्र आपले शब्द आणि त्यामाध्यमातून येणाऱ्या कविता आपणास ‘अनंत’ बनवतात, असे म्हणत, ‘अक्षर-अक्षर गुंफीत जारे, शब्दांचा सागर जोड…’ या आपल्या पंक्तिंसह त्यांनी आपले मनोगत मांडले.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर झालेल्या काव्यमैफिलीत प्रा.अमोल आगाशे, प्रा.अमन कांबळे, डॉ.उज्वल मिश्रा, प्रा.यशस्विनी पिसोळकर, डॉ.नंदकुमार शिंदे, प्रा.स्नेहल वानखडे, डॉ.बाळासाहेब वाकडे यांनी कविता सादर केल्या. पसायदानाने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ठाकूर यांनी तर आभार प्रा. दिल किरत सरना यांनी मानले. तर सुत्रसंचलन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
कराड कुटूंबाला कवितांचा वारसा…
ज्येष्ठ कवी म.भा.चव्हाण यावेळी म्हणाले, कराड कुटूंबाला कवितेचा मोठा वारसा आहे. प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय उर्मिला ताई कराड या सुंदर कवयित्री होत्या. त्यांनी आपल्या साहित्य प्रेमाच्या माध्यमातून अनेक कविता संग्रहांचे प्रकाशन व काव्य मैफिलींचे देखील आयोजन केले. आता हाच वारसा कराडांची पुढची पिढी वाढवत असल्याचा आनंद आहे. तसेच, ‘छोटा असो की मोठा आवाज वाढवा.. दर्यात पोहणारा माणूस वाचवा..’ या आपल्या पंक्तींनी त्यांनी मनोगताचा समारोप केला.