लोणी काळभोर, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील कारखान्यातून सिमेंटचे पाईप तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी चाकांच्या चोरीची उकल करण्यात उरुळी कांचन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी लोणी काळभोर येथील एका कथित पत्रकारासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
सुरज दिलीप उकिरडे (वय 26, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), असे कथित पत्रकाराचे नाव आहे. तर त्याचे साथीदार नागेश धरसिंग मकवाने (वय 26, रा. रुखे वस्ती, थेऊर), सुनील प्रकाश चव्हाण (वय 29, रा. काळे वस्ती, थेऊर), निलेश सदाशिव मोरे (वय 25, रा. भिल्ल वस्ती, थेऊर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीत वापरलेला 5 लाख रुपयांचा टेम्पो व सिमेंट कारखान्यातील चोरीची 1 लाख 40 हजार रुपयांची चाके असा 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आदीरा इंटप्रायजेस या कारखान्यातून 18 जुलैला संध्याकाळी सिमेंटचे पाईप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 लाख 40 हजार रुपये किमतीची लोखंडी चाके अज्ञात चोरट्यांनी कारखान्यातून चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा उरुळी कांचन पोलिसांचे गुन्हे शोध पथक गुरुवारी (ता. 01) तपास करीत असताना पोलिस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली, आरोपी हे थेऊर परिसरातील असून त्यांनी कारखान्यातून टेम्पोच्या सहाय्याने लोखंडी चाके चोरून नेली आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता यातील आरोपी सुरज उकिरडे हा कथित पत्रकार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता वरील चौघांनीही कारखान्यातून लोखंडी रिंगा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेली 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची लोखंडी धातूची 12 इंच व्यासाची 20 चाके प्रत्येकी वजन 60 किलो प्रमाणे व गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किंमतीचा सुपर कॅरी टेम्पो असा एकूण 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती.
सदरची कारवाई दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, उरुळी कांचन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार रमेश भोसले, महेंद्र गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कामठे, अमोल खांडेकर, सुमित वाघ, तात्या करे, प्रवीण चौधर, दीपक यादव, यांनी केली आहे.
हडपसर व लोणी काळभोर परिसरात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट…
हडपसर, लोणी काळभोर परिसरात बोगस पत्रकारांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहेत. अवैध बांधकाम व इतर दोन नंबर व्यावसायिक यांना धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अवैध धंद्यांची बातमी करतो, अशी धमकी देऊन पैसे उकळल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. कथित पत्रकार तक्रारदारास भेटून मिटवून घ्या, असा मोलाचा सल्ला देतात. त्यामुळे या बोगस पत्रकारांनी उचछाद मांडला आहे. हे महाशय तक्रार देतात आणि मिटविण्यासाठी हजारो रुपये उकळतात असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.