पुणे : पुण्यातील आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण सुरु होतं. यावेळी उपोषणाला बसलेल्या ऑल इंडिया वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्याला बांबूने आणि हत्याराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार रविवारी ४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बाहेरील फुटपाथवर घडला आहे.
याबाबत अजय पोपट मखरे (वय-23 रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नितीन परदेशी (वय-30), देवा खिवनसरा, विनोद जाधव व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे ऑल इंडिया वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ते ससून हॉस्पिटल समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाहेर आरटीओ कार्य़ालयातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषणाला बसले आहेत. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्य़ादी यांचे ओळखीचे आरोपी उपोषणाच्या ठिकाणी आले. यावेळी आरोपींनी उपोषणाला का बसतो असं म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाकडी बांबूने आणि लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे करत आहेत.