पुणे : पुण्यातील कर्वे रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी पावणे बाराच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौक परिसरात घडली आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक सुनील बाबू होले (वय-३५, रा. गल्ली क्रमांक १६, गोखलेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (१९ ऑगस्ट) ते कामानिमित्त कर्वे रस्त्यावरील नळस्टाॅप चौकाकडे निघाले होते. रसशाळा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास ते निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार देशमुख यांना डंपरने पाठीमागून धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील देशमुख हे कृषी विभाग अधिकारी होते. ते दोनच वर्षांपुर्वी निवृत्त झाले होते. दरम्यान ते विमाननगर भागातील निको गार्डन येथे राहत होते. देशमुख हे कामानिमित्त सोमवारी (दि १९ ऑगस्ट) कर्वे रस्त्यावरील नळस्टाॅप चौकाकडे निघाले होते. पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील अष्टेकर ज्वेलर्स समोर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांना जोराची धडक दिली.
दरम्यान, सकाळीच अपघात झाल्याने कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी डंपरचालक भोसले याला ताब्यात घेतले. त्याला सायंकाळी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, देशमुख कुटूंबावर शोककळा पसरली आहे.