पुणे : शरद पवारांनी एका पत्रकार परिषेदेत सुनेत्रा पवारांना बाहेरून आलेल्या पवार असं वक्तव्य केलं आहे. ज्या पत्रकार परिषदेत पवार बोलले आहेत, त्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या या वक्तव्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे हासले होते. त्यांच्या या हसण्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
डॉ. कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्याशी केली आहे. मिटकरी म्हणाले, डॉ. कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले, हा वाद घरगुती जरी वाटत असला तरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केल आहे. त्याचा सर्वच पक्षातून निषेध होत आहे. याबाबत आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे कि, पवार कुटुंबियांनी त्यांना सून म्हणून निवडलं. मात्र, बारामतीकरांनी त्यांना एक उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील.
मात्र, ही पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे, की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का?
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नसल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
ज्याप्रमाणे दुर्योधन, दु:शासन आणि रावण हसले होते त्याच पद्धतीने हसण्याचं पाप कोल्हे यांनी केलं आहे. कोल्हेंच्या प्रवृत्तीचे खरे दर्शन या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, याचा हिशेब सर्वसामान्य जनता त्यांच्याच मतदारसंघातून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.