भोसरी, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील यांची वर्णी लावली आहे, तेंव्हापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विलास लांडे यांच्याबाबत सुचक विधान केलं आहे. कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विलास लांडे हे शरद पवार गटात येण्यासाठी संपर्क साधत आहेत का? असं विचारलं असता मोहीम फत्ते झाल्याशिवाय निकाल सांगायचा नसतो, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. त्यामुळे विलास लांडे येत्या काही दिवसांत कोणता निर्णय घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
शिरुर लोकसभेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी आणि अजित पवार गटाचा उमेदवार असलेल्या आढळराव पाटलांचा पराभव करण्यासाठी अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज कोल्हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत.
गेली 35 वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019 ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी 10 वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असं विलास लांडे म्हणाले होते. पण, तरीही त्यांना डावलण्यात आलं आणि आयात उमेदवार घेऊन आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे विलास लांडे नाराज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता विलास लांडे शरद पवार गटात जाणार का?, अशा चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत.