पुणे : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. शिरूर लोकसभा निश्चय मेळावा आणि भोसरी विधानसभेची आढावा बैठक जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला.
दुसरीकडे, अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे. त्याला प्रत्युत्तर देत अमोल कोल्हेंनी सुद्धा अजित पवारांना डिवचले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांचे सध्या दौरे वाढले आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यापासून अमोल कोल्हे चर्चेत आहेत. कोणत्या गटात रहावे अशी त्यांची मनस्थितीत झाल्याचे समोर आले होते. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी नंतर भूमिका बदलून शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. यानंतर निवडणुक आयोगात दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले होते. नंतर त्यांनी अजित पवार गटाकडून फसवून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप केला होता.