शिरूर: मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता आहे, असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. तसेच मतदारसंघातील पीडिसीसी बँक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी देखील कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच मतदान झालेल्या ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पैसे वाटप करताना आढळल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातही असाच पैसे वाटण्याचा प्रकार पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्याही शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमधूनही पैसे वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आणि आढळराव यांच्या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे.
आता खासदार अमोल कोल्हे यांच्या पत्रावर शिरूरचे निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरूर लोकसभेसाठी १३ मेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.