पुणे : येथे आज महाविकास आघाडीची सभा पार पडली आहे. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित दादांवर (Ajit Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे.
नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, असा हल्लाबोल खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केला आहे.
पुढे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मी आता फक्त ट्रेलर दाखवतो. पुढे पिक्चर दाखवायला आपल्याकडे खूप वेळ आहे. एक गोष्ट मला जाणवतेय की, जनतेचे ठरलेले आहे. आपल्या या बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन् विजयाची तुतारी फुंकायची आहे. मी पहिल्यांदा संसदेत गेलो तेव्हा मला सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की, जेव्हा जनतेच्या धोरणाविषयी चर्चा होईल, देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा रहा. तेव्हा तुझा आवाज सर्व सामान्य लोकांसाठी गरजला गेला पाहिजे.
डॉ. कोल्हे म्हणाले की, परवा कुणीतरी विचारले नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे. मी त्यांना सांगितले की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर केली आहे.
काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या एका सभेत अजित दादा पवारांनी तुम्हाला हवा असेल तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं आहे. यावरून अमोल कोल्हे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अजित पवार म्हणतायेत की कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. कर काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन् त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का? असा सवालदेखील कोल्हेंनी उपस्थित केलाय.