पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच एक बैठक मुंबईत पार पडली. त्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर मतदारसंघातील आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळरावांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघानंतर आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
त्यामुळे आता शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार अमोल कोल्हेंच्या तोडीस तोड उमेदवार मिळत नव्हता आणि महायुतीला ही जागा काही गमवायची नव्हती.
अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यात महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागण्याच्या सूचना आढळराव पाटील यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील हे आता स्पष्टच झाले आहेत.
यानिमित्ताने शिरूर लोकसभा लढवून आढळरावांना गेल्या निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी संधी मिळाली आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हेंनी आढळरावांना धूळ चारली होती. त्यामुळे आढळरावांचा खासदारकीचा चौकार हुकला होता. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.