शिरुर: प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे सर्वत्र आपल्या अभिनयातून घराघरात पोहचले आहेत. कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अमोल कोल्हे हे एक प्रसिद्ध अभिनेते असून ते सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. अमोल कोल्हे पु्न्हा एकदा २०२४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये मैदानात उतरले आहेत. तसेच कोल्हे हे कलाकार असून त्यांना मतदारसंघातील कामांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी टीका विरोधकांकडून प्रचारादरम्यान केली जात आहे. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त असताना खासदार अमोल कोल्हे यांनी मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये हिल्यांदा शिरूर लोकसभेतून ते खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. शिरूरच्या जनतेचे महत्वाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुढची ५ वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय कोल्हे यांनी केला आहे. काम प्रत्यक्षात येण्यासाठी त्याला वेळ देणे गरजेचे आहे. मालिका विश्वात काम करून मतदारसंघात एवढा वेळ देणं शक्य नाही. त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्ष ब्रेक द्यावा लागणार आहे, असे स्पष्ट मत स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.