पुणे : आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले आहे, त्याला तोड नाही. वर्तमानात यामध्ये किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली, असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे.
सध्या कांदा उत्पादक, सोयाबीन आणि दूध उत्पादक शेतकऱ्याचे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, हेच महात्मा फुले यांना खरे अभिवादन असेल, असं देखील कोल्हे म्हणाले.