पुणे : नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविला तर खासदारांचे निलंबन केले जाते. नागरिकांच्या प्रश्नांना कोणीही वाली नाही. केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी २७ ते ३० डिसेंबरदरम्यान शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० डिसेंबर रोजी हा मोर्चा धडकणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून हा मोर्चा मार्गस्थ होणार असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाची सांगता सभा होणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर बोलताना कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केल्यानंतर सुप्रिया सुळे, माझ्यासह तब्बल १४१ खासदारांना अध्यक्षांनी निलंबित केले आहे. या कारवाईमधून केंद्र सरकारचा बुरखा फाटला आहे. माझ्यासह देशातील जनतेने २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेतील पायर्यांवर नतमस्तक होताना पाहिले आहे. पण, आज संसदेतील सहकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत येऊन निवेदन करावे, हे सांगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी २७ ते ३० डिसेंबरदरम्यान शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अमोल कोल्हे म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचे मला निमंत्रण नाही. मात्र, माझी एकच अपेक्षा आहे. राम मंदिराचे उदघाटन थाटामाटात करा, पण या देशात रामराज्य आणण्याची मोठी जबाबदारी आहे, याचीदेखील जाणीव ठेवा.