कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही, पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! कोल्हेंच अजित पवारांना धारधार शब्दात उत्तर
पुणे : तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार पाहिजे, असा सवाल करत अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. यावर आता कोल्हे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिल आहे. अमोल कोल्हे यांनी ‘सह्याद्री’समोरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये माझे काका अभियन क्षेत्रात नव्हते, असे सुचवताना मला घराणेशाहीचा वारसा नाही असं म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा नटसम्राट असा उल्लेख करून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
काय म्हणाले अमोल कोल्ह?
कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही. पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो, ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही. तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर… आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो. ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर…अशी फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, मागील पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या सभांना अनेक ठिकाणी आलो होतो.
मात्र, पाच वर्षाच्या मध्येच डॉ. अमोल कोल्हे मला म्हणायला लागले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारचं नाही. दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता, मालिकेत काम करणारा कलावंत आहे. त्यामुळे माझं मोठं नुकसान होत आहे. यामुळं मला राजीनामा द्यायचा आहे.
मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर एकच म्हटलं की, बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षांकरीता निवडून दिलं आहे. जरा कळ काढ, जरा कळ काढ, पाच वर्ष पूर्ण होऊ दे, पुन्हा नको उभा राहू बाबा, मी पुन्हा उभा रहा देखील म्हणणार नाही. पण आता त्यांना काय झालं की, पुन्हा जोर आणि बैठका सुरू केल्या, असं अजित पवार म्हणाले होते.
View this post on Instagram