पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या ५९८ पदांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील अमोल घुटुकडे हे राज्यात तसेच मागासवर्गातून प्रथम आले, तर महिलांमधून अनिशा आगरकर या प्रथम आल्या.
निकालाची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या ६०३ पदांपैकी ५ पदांचा निकाल राखून ठेवून उर्वरित ५९८ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यास किंवा आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीवेळी न केल्यास अशी उमेदवारी रद्द करण्यात येईल.