पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणातून भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यासाठी कामाला आली आहे. कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील प्रचार करत असताना बालवडकर आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी दोघांनी नाराजी बाजूला ठेवून एकमेकांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. सर्वांनी एकजुटीने काम करून चंद्रकांत पाटील यांना विजयी करायचे आहे, असा निर्धार या वेळी बालवडकर यांनी व्यक्त केला.
कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत असताना अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही यादीची वाट पाहू, असे वक्तव्य बालवडकर यांनी करत नाराजी कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भाजपच्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटलांचे नाव आल्याने बालवडकर बंडखोरीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली होती.
बालवडकर यांनी बंडखोरी केल्यास चंद्रकांत पाटील यांची मोठी अडचण होण्याची शक्यता होती. मात्र, आता मतभेद दूर झाल्याचे दिसून येत आहे. अमोल बालवडकर म्हणाले, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते. मात्र, आज ते मतभेद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून, चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देत आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूडमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि त्यांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्यासोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे.