नारायणगाव : नारायणगाव येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. रुग्णवाहिकेचा सायरन का वाजवतो, या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना येथील पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी सोमनाथ भास्कर गायधने (वय-३२, रा. कडाचीवाडी चाकण, ता. खेड) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून धनेश तळपे व एक अज्ञात तरुण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी फरार झाले असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे. रुग्णवाहिका चालक हे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून रुग्णवाहिका घेऊन जात होते. त्यावेळी रुग्णवाहिकेचा सायरन सुरू होता. त्यामुळे धनेश तळपे आणि त्याचा एक अन्य एक साथीदार या दोघांनी मिळून पाठलाग करून सोमनाथ गायधने यांची रुग्णवाहिका मोटर सायकल आडवी लावली.
दरम्यान, माऊली मिसळ हाऊस या हॉटेल जवळ रुग्णवाहिका थांबवली. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीतून तळपे आणि त्याच्या अज्ञात साथीदाराने रुग्णवाहिका चालक सोमनाथ याला खाली ओढले. ‘रुग्णवाहिकेचा सायरन का सुरू ठेवला’ या कारणावरून गायधने यांना आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.