बापू जाधव
निमोणे : ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व क्षेत्रांत नावलौकीक मिळवत आहे. शिक्षक, आई व वडील तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. याची जाणीव ठेवून आभासी दुनियेत न रमता वाचन, मन, संस्कृती जोपासा. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवतात, हे विसरू नका, असा ठाम विश्वास शिरुरच्या उपपोलीस निरिक्षक सुजाता पाटील यांनी व्यक्त केला.
निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसीराव कोल्हे होते. या वेळी मुख्याध्यापक राजाराम ढवळे, सरपंच संजय काळे, निमोण्याच्या पोलीस पाटील इंदिरा जाधव, जे. आर. काळे, नवनाथ गव्हाणे, संतोष काळे, शाळेचे शिक्षक शरद दुर्गे, अनिल शिनगारे, प्रफुल सरवदे, चुनिलाल पाटील, ए. के. वाघ, पी. ए. तिवारी, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या की, शालेय जीवनात आरोग्याची जपणूक करा. कला, क्रिडा क्षेत्रात नावलौकीक मिळवा. त्यातून तुमचे व्यक्तिमत्व उंचावण्याचा प्रयत्न करा. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना तुम्हाला या व्यक्तिमत्वाची फार गरज पडणार आहे. त्यामुळे भविष्यात कशामध्ये करिअर करायचे, हे आजच निश्चित करा. शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाचा फायदा घ्या.