योगेश पडवळ
Ambegaon News : पाबळ, (पुणे) : लोणी (ता. आंबेगाव) आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेनेचे ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये खोटी आश्वासन व गद्दारी करून स्थापन झालेल्या बेकायदा सरकारचा पोलखोल करण्यात येत असून, या अभियानाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
अभियानाला जनतेचा पाठिंबा
मंचर, अवसरी, मेंगडेवाडी, निरगुडसर, जारकरवाडी, धामणी, लोणी व इतर अनेक गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, तालुकाप्रमुख दत्ताभाऊ गांजाळे, महेश वाघ, महिला आघाडीच्या सुरेखा निघोट, सचिन लबडे, माऊली पाटील, संतोष पंचरास, विशाल बोराडे, विकास गायकवाड, लोणी धामणी परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
लोणी येथील बाजारात भेट देऊन शेतकरी, व्यापारी, नागरिक यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. समुद्रातले शिवस्मारक झाले का, दाऊदला आणले का, गंगा स्वच्छ झाली का, स्मार्ट सिटी झाल्या का, कश्मिरी पंडित घरी परतले का, मराठा, धनगर आरक्षण दिले का, अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा केली.
दरम्यान, जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले, “पंधरा लाख रुपये खात्यात आले का? गॅसच्या किमती वाढवल्या तसेच अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता केली नाही. निवडणुका आल्या की, लोणी धामणी परिसरात म्हाळसाकांत जलसिंचन योजना होणार असे आश्वासन गेली ३५ वर्षांपासून दिले जात आहेत.
छेडले जाईल पाण्यासाठी अंदोलन..
सातगाव पठारावर कळमोडीचे पाणी येणार म्हणून शेतकऱ्यांच्या सातबारावर कळमोडीची शिक्के पडले. अद्याप पाणी मिळाले नाही. खेडचे लोकप्रतिनिधी सांगतात की, रक्त सांडले तरी चालेल पण कळमोडीचे पाणी आंबेगावसाठी देणार नाही. डिंभे धरणाचे ५१ टक्के पाणी इतर तालुक्यात, जिल्ह्यात जाते हेच डिंभे धरणाचे पाणी सातगाव पठार व लोणी धामणी परिसरास मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. पाण्यासाठी यापुढील काळात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.