-पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सलग आठव्यांदा विजय संपादन केल्यानंतर शिरुर तालुक्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या 42 गावातील वळसे पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला.
विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांच्या विजयात रांजणगाव गणपती – कारेगाव जिल्हा परिषद गटातील रांजणगाव गणपतीसह बाभूळसर खुर्दने आघाडी देत महत्वाची भूमिका बजावली.
रांजणगाव गणपती येथील एसटी स्टॅन्ड चौकात फटाक्यांची मुक्तपणे आतषबाजी व गुलालाची उधळण करत वळसे पाटील समर्थक व महायुतीचे कार्यकर्ते आनंदामध्ये न्हाऊन गेले होते. यावेळी समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. पाचुंदकर यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
यावेळी आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, प्रा.माणिक खेडकर आदिसह समर्थक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या विजयाचा कारेगाव, ढोकसांगवी, बाभूळसर खुर्द, सोनेसांगवी, खंडाळे, वाघाळे, पिंपरी दुमाला, निमगाव भोगी येथेही कार्यकर्त्यांनी विजयाबद्दल जल्लोष केला.
सहकारमंत्री वळसे पाटील यांनी गेल्या पस्तीस वर्षात केलेल्या भरीव सर्वांगीण विकासकामांचा हा विजय आहे. वळसे पाटील कुटुंबियांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे. भरीव विकासकामे केल्याने मतदारांनी त्यांच्या कामाची उतराई केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पाचुंदकर यांनी सांगितले.